ज्ञानेश्वर विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे भगवान बाबा

ज्ञानेश्वर विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
प्रा. दिलीप नाईकवाड, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ, रूम्हणा यांच्या वतीने संचलित ज्ञानेश्वर विद्यालय तसेच ज्ञानेश्वर मराठी प्राथमिक शाळेत ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ व मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठित नागरिक सुनील किसन मांटे तर अध्यक्ष म्हणून राजेश संपतराव ससाणे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ रूम्हणा संस्थेचे सचिव शिवराज कायंदे, अभियंता विकास सांगळे यांची विशेष उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत, नृत्याविष्कार, प्रेरणादायी भाषणे तसेच देशप्रेम जागवणाऱ्या नाट्यछटांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, संविधानाची मूल्ये तसेच सामाजिक जाणीव यांचा प्रभावी संदेश दिला. त्यांच्या सादरीकरणास उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांकडून भरभरून दाद मिळाली.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता. एकता, बंधुता व स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या कार्यक्रमामुळे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य सार्थ ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. जगदिश यादव यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीने विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जी. के. नागरे, ए. बी. आंधळे, यु. बी. लांडगे, कुरेशी, डाखोरे सर, शर्मा मॅडम, प्रा. यादव सर, नदीम, साळवे, पी. पी. नागरे, जायभाये, देशमुख आदी सर्व शिक्षक व कर्मचारी बंधूंनी मोलाचे सहकार्य केले.
अशा प्रकारे ज्ञानेश्वर विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.




