वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे शेती संकटात
तळेगाव बाजार परिसरातील शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे शेती संकटात
तळेगाव बाजार परिसरातील शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
तेल्हारा तालुका प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे
तळेगाव बाजार (ता. तेल्हारा):
तळेगाव बाजार परिसरात शेतीसाठी मिळणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली असून वीज वितरण कंपनीच्या हलगर्जी व निष्काळजी कारभारामुळे शेती पूर्णतः संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर जागरूक शेतकऱ्यांनी मंगळवार, दि. 2 फेब्रुवारी रोजी तेल्हारा तहसील कार्यालयात तहसीलदार व वीज वितरण अधिकाऱ्यांना जाब विचारत निवेदन सादर केले.
या भागात गहू, हरभरा, कांदा, टरबूज, ज्वारी, मका, तूर, तिळ आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र दररोज दोन ते तीन तास वीजपुरवठा बंद राहत असल्याने सिंचन व्यवस्था कोलमडली असून उभ्या पिकांना तडे जाण्याची वेळ आली आहे. वेळेवर पाणी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर पिके सुकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनात वीज वितरण कंपनीने तातडीने नियमित व ठरलेल्या वेळेत वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा ठाम इशारा दिला आहे. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी अक्षय खारोडे, विकास खारोडे, जमीरेहिन दीपक गव्हाणे, सुधीर पाटील, वैभव खारोडे, मयूर खारोडे, पवन चोपडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या मागणीला शेतकऱ्यांचा जोरदार पाठिंबा मिळत असून परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.




