धक्कादायक! नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर शोककळा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष मा. ॲड. रविंद्रनाना पगार यांचे दुःखद निधन

धक्कादायक! नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर शोककळा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष मा. ॲड. रविंद्रनाना पगार यांचे दुःखद निधन
नाशिक / येवला | प्रतिनिधी : प्रविण पाटील
नाशिक जिल्ह्याच्या राजकारणासाठी मंगळवारचा दिवस अत्यंत दुःखद ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ञ व अभ्यासू नेतृत्व मा. ॲड. रविंद्रनाना पगार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक क्षेत्रातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
मा. ॲड. रविंद्रनाना पगार हे केवळ पक्षाचे पदाधिकारी नव्हते, तर ते सामान्य कार्यकर्त्यांचे आधारवड म्हणून ओळखले जात होते. शांत स्वभाव, संयमी भूमिका, कायद्याचे सखोल ज्ञान आणि संघटन कौशल्य यांच्या बळावर त्यांनी नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भक्कम बांधणी केली. मतभेदांच्या प्रसंगीही त्यांनी नेहमीच संवाद व समन्वयाचा मार्ग स्वीकारत राजकीय संस्कृतीला दिशा दिली.
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांपासून ते शहरी युवकांपर्यंत सर्वांशी थेट संपर्क ठेवत त्यांनी पक्ष मजबूत केला. शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवण्यासाठी ते सातत्याने सक्रिय होते. अनेक कार्यकर्त्यांनी “नाना म्हणजे शब्दाला जागणारे नेतृत्व” अशी भावना व्यक्त केली आहे.
त्यांचा अंत्यविधी बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता, त्यांचे मूळगाव ऊत्राणे, ता. बागलाण (सटाणा), जि. नाशिक येथे होणार आहे. अंत्यदर्शनासाठी राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असून, त्यांनी जपलेली मूल्ये आणि विचारसरणीच पुढील पिढीतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरणार आहे.
नाना, आपल्या कार्याची उणीव नाशिक जिल्ह्याला सदैव भासत राहील.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐



