२५ वा रौप्य महोत्सव : श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त श्री पालखी मिरवणूक भक्तिभावात व उत्साहात संपन्न

२५ वा रौप्य महोत्सव : श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त श्री पालखी मिरवणूक भक्तिभावात व उत्साहात संपन्न
प्रा. दिलीप नाईकवाड | बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील कुंभारी परिसरात असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप अत्यंत भक्तिमय, आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सप्ताहाच्या सांगतेनिमित्त श्री संत गजानन महाराजांची भव्य पालखी मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि “गण गण गणात बोते”च्या जयघोषात काढण्यात आली.
दि. १ ते ८ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या काळात दररोज काकडा भजन, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, श्री गजानन विजय ग्रंथ पारायण, तसेच रात्री हरिकीर्तन असे विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाले. भागवताचार्य स्वामी परमेश्वर यतीजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतील श्रीमद् भागवत कथेने भाविक मंत्रमुग्ध झाले.
सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी काल्याचे कीर्तन ह.भ.प. निकम महाराज यांनी केले. त्यांच्या कीर्तनातून भक्ती, वैराग्य व समाजप्रबोधनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. त्यानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीतून मिरवण्यात आली.
या पालखी मिरवणुकीत तब्बल ३५ वारकरी दिंड्यांनी सहभाग नोंदवला होता. टाळकरी-वारकरी, दिंडीकरी, महिला, युवक, वृद्ध, बालगोपाल तसेच असंख्य गजानन भक्त मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते. पालखी मार्गावर नागरिकांनी सुंदर सडा-रांगोळ्या काढून संपूर्ण परिसर भक्तीमय स्वरूपात सजविला होता. जागोजागी भाविकांकडून चहा, पाणी, नाश्ता यांची स्वयंस्फूर्त व्यवस्था करण्यात आली होती, हे या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.
या वर्षीचा उत्सव २५ वा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या निमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणून गणपती नेत्रालय, जालना यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास १००० नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
सप्ताहाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. परिसरातील विविध गावांतील श्री संत गजानन महाराज सेवाधारी, वारकरी व टाळकरी मंडळांनी महाप्रसाद वितरणासाठी विशेष सहकार्य केले. तसेच अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी होण्यासाठी श्री संत गजानन महाराज वारकरी-टाळकरी मंडळाचे योगदान उल्लेखनीय ठरले.
या प्रकट दिनानिमित्त एक दिवसाची यात्रा भरविण्यात आली होती. या यात्रेला परिसरातील व दूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी उपस्थिती लावून श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले व समाधान व्यक्त केले.
या अखंड हरिनाम सप्ताह व रौप्य महोत्सवाचे आयोजन श्री संत गजानन महाराज सेवाभावी मंडळ, कुंभारी परिसर, देऊळगाव राजा यांनी केले होते. संपूर्ण उत्सव शांतता, शिस्त व भक्तिभावाच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.




