उपोषणएटापल्लीगडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भशेतकरीशेती न्यूजसामाजिक कार्यकर्तेसोशल मीडिया

खड्डेमय रस्त्यांविरोधात एटापल्ली येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू

एटापल्ली : तालुक्यातील एटापल्ली–देवदा–गडचिरोली, एटापल्ली–जारावंडी तसेच एटापल्ली–हेडरी–गट्टा हे

खड्डेमय रस्त्यांविरोधात एटापल्ली येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू

         जिल्हा प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार

एटापल्ली : तालुक्यातील एटापल्ली–देवदा–गडचिरोली, एटापल्ली–जारावंडी तसेच एटापल्ली–हेडरी–गट्टा हे प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाचे मार्ग सध्या पूर्णपणे खड्डेमय झाले असून त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. परिणामी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

दररोज शेकडो विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, व्यापारी तसेच ग्रामीण भागातील नागरिक या रस्त्यांवरून ये-जा करतात. मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. दुचाकीस्वार घसरून जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. विशेषतः रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकत नसल्याने गंभीर रुग्ण व गरोदर महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी पावसाचे पाणी साचून खड्ड्यांची तीव्रता अधिक वाढली असून रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिकच वाढतो.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की संबंधित रस्त्यांवर नुकतेच दुरुस्तीचे काम झाले होते; मात्र ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. अल्पावधीतच डांबर उखडल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर एटापल्ली येथील सन्माननीय पत्रकार बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन तात्काळ दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर पत्रकारांनीच पुढाकार घेत दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, एटापल्ली कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.

आंदोलन स्थळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक तसेच युवकांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनीही आंदोलन स्थळी भेट देऊन पत्रकारांच्या भूमिकेचे कौतुक केले व शासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी केली.

शासन व प्रशासनाने त्वरित रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात करावी, अन्यथा राष्ट्रीय लोक न्यास आंदोलन तसेच भारतीय जनसंसद जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!