जय जिजाऊजयंतीमहाराष्ट्रयुवाशिवजयंतीसामाजिक कार्यकर्ते

शिवचरित्राचा जागर; साई गणेशा नगरात शिवभक्तांचा भावपूर्ण उत्सव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साई गणेशा नगर येथे

शिवचरित्राचा जागर; साई गणेशा नगरात शिवभक्तांचा भावपूर्ण उत्सव

प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साई गणेशा नगर येथे शिवप्रेम, अभिमान आणि प्रेरणेचा अविस्मरणीय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संपूर्ण परिसर “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. शिवरायांच्या तेजस्वी स्मृतींनी वातावरण भारावून गेले असून कार्यक्रमात शिवचरित्राचा जागर करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित मान्यवर व शिवभक्तांनी पुष्पहार अर्पण करून कृतज्ञ अभिवादन केले. या पवित्र प्रसंगी ह.भ.प. गुरुवर्य गोपाळ महाराज यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्रातील पराक्रम, न्यायनिष्ठा, स्वाभिमान, स्त्री-सन्मान आणि स्वराज्याची उदात्त संकल्पना यांचा सखोल व भावपूर्ण ऊहापोह केला.

आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, “शिवचरित्र हे केवळ इतिहासातील सुवर्णपान नसून प्रत्येक पिढीला धैर्य, कर्तव्यपरायणता, राष्ट्रनिष्ठा आणि नैतिक मूल्यांची प्रेरणा देणारा जाज्वल्य दीपस्तंभ आहे.” त्यांच्या प्रभावी विचारांनी उपस्थित शिवभक्त मंत्रमुग्ध झाले. युवकांनी शिवरायांच्या आदर्शांचा अंगीकार करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प केला.

या प्रसंगी छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान चे राजेंद्र पाटील खारोडे, तळहारा बाजारचे पोलीस पाटील जनार्दन पाटील खारोडे, माजी नगराध्यक्ष मुलचंदजी राठी तसेच अशोकराव नेमाडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवरायांच्या कार्याचा गौरव करत समाजात एकात्मता, शौर्य, संस्कार आणि राष्ट्रभक्ती जपण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे भैय्या पाटील खारोडे, शिवा खारोडे, धनराज पवार, शेखर भुजबुळे, सचिन नहाटे, संतोष थोरात, खूमकर साहेब, शांताराम सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभुराजे बहुउद्देशीय क्रीडा शिक्षण संस्था व संभुराजे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी असंख्य शिवभक्त उपस्थित होते. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

संपूर्ण सोहळा भक्तिमय, प्रेरणादायी आणि भावनांनी ओतप्रोत वातावरणात पार पडला. शिवरायांच्या विचारांचा जागर करत समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!