
एटापल्ली–गुरुपल्ली मार्गावर भीषण अपघात दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर
जिल्हा प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार
एटापल्ली : शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरुपल्ली गावाजवळील एटापल्ली–गुरुपल्ली मार्गावर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकी अक्षरशः चकनाचूर झाल्या.
एटापल्ली येथून मजुरीचे काम आटोपून आलापल्लीकडे दुचाकीवरून जात असलेले रमेश धर्मा मडावी (रा. नलिकोण्डा, तेलंगणा राज्य) व विलास भगवान टेकाम हे प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या दुचाकी चालक सोमजी मडावी (रा. करपनफुडी, ता. एटापल्ली) याच्याशी त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत रमेश धर्मा मडावी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातात गंभीर जखमी झालेले विलास भगवान टेकाम व सोमजी मडावी यांना तात्काळ उपचारासाठी एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच एटापल्ली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस करीत आहेत.
दरम्यान, एटापल्ली–गुरुपल्ली हा मार्ग अरुंद व वळणावळणाचा असून या मार्गावर वेगमर्यादा, हेल्मेट वापर आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे, समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेऊन वाहन चालवणे तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वाहतूक प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या जीवाची काळजी घेत वाहन चालवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.




