२० लाखांच्या तांडा वस्ती रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार उघड; ४० महिलांचे उपोषण – प्रशासन हादरले, चौकशीचे लेखी आश्वासन
देऊळगाव कुंडपाळ (ता. लोणार) येथील तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या २० लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामात उघड उघड

२० लाखांच्या तांडा वस्ती रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार उघड; ४० महिलांचे उपोषण – प्रशासन हादरले, चौकशीचे लेखी आश्वासन
रघुनाथ आघाव लोणार तालुका प्रतिनिधी
देऊळगाव कुंडपाळ (ता. लोणार) येथील तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या २० लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामात उघड उघड भ्रष्टाचार, निकृष्ट काम व शासकीय निधीच्या अपहाराचा गंभीर आरोप करत बंजारा समाजातील महिलांनी प्रशासनाविरोधात थेट रणशिंग फुंकले. ग्रामपंचायत सदस्या सौ. नंदाबाई प्रमेश्वर राठोड यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४० महिलांनी लोणार पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करून प्रशासनाच्या दारातच अन्यायाचा जाब विचारला.
तांडा वस्ती सुधार योजनेतून बंजारा वस्तीत अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी २० लाखांचा निधी मंजूर झाला. मात्र प्रत्यक्षात ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून रस्त्याची जाडी कमी ठेवली, सिमेंट काँक्रीटचे प्रमाण घटवले, मुरूम व साहित्याचा वापर नियमबाह्य पद्धतीने केल्याचे स्पष्ट निदर्शनास आले आहे. काम पूर्ण होताच काही ठिकाणी रस्ता उखडू लागला असून, हे काम केवळ कागदोपत्री पूर्ण दाखवून संपूर्ण निधी लाटण्यात आल्याचा संतापजनक आरोप महिलांनी केला आहे.
ठेकेदार आणि काही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून शासकीय निधीचा उघड अपहार केल्याचा आरोप करत या प्रकरणाची १५ दिवसांत सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच अपहाराची रक्कम संबंधितांकडून वसूल करावी, अशी ठाम व स्पष्ट मागणी उपोषणकर्त्या महिलांनी केली.
महिलांच्या तीव्र आंदोलनाची दखल घेत मेहकर मतदारसंघाचे माजी आमदार मा. डॉ. संजयजी रायमुलकर साहेब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन संतप्त महिलांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यांनी गटविकास अधिकारी मा. उमेशजी देशमुख साहेब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करण्याची ठाम मागणी केली. शासकीय निधीचा अपहार हा गंभीर गुन्हा असून, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
अखेर प्रशासनाने चौकशी करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र हे स्थगिती अंतिम नसून, केवळ इशारा असल्याचे महिलांनी स्पष्ट केले आहे.
जर ठरलेल्या कालावधीत ठोस चौकशी, कारवाई आणि अपहाराची वसुली झाली नाही, तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि महिला पुन्हा रस्त्यावर उतरतील, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
तांडा वस्ती सुधार योजनेचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचावा, भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई व्हावी, हीच या आंदोलनामागील ठाम भूमिका असून, आता प्रशासनाने वेळकाढूपणा केला तर परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट संदेश या आंदोलनातून देण्यात आला आहे.
यावेळी माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख बळीभाऊ मापारी, उबाठा शिवसेना बुलढाणा जिल्हा संघटक गोपालसिंग बच्छिरे, गजानन जाधव, पांडुभाऊ सरकटे, गजानन मापारी, राजुभाऊ बुधवत, विजय सानप, संतोष उर्फ पिंटू आघाव, रामेश्वर आघाव, विजय चव्हाण (सरपंच), समाधान राठोड (सरपंच), भाग्यवंत (सरपंच), बाबुसिंग जाधव, रोहिदास जाधव, डॉ. लक्ष्मण जाधव, लिंबाजी राठोड (सरपंच), दशरथ राठोड (सरपंच), शेषराव डोंगरे (सरपंच), अमोल सरकटे, सुनील नरवाडे, ज्ञानेश्वर गाढवे, परमेश्वर राठोड, राजुभाऊ इंगळे, सुदन अंभोरे, सौ. तारामती जायभाये, ॲड. शिवाजी सानप, संतोष सरकटे, श्यामभाऊ राऊत, महिपत वाणी, गटविकास अधिकारी मा. उमेशजी देशमुख, अधीक्षक मा. रविभाऊ मापारी, मुंढे साहेब, लक्ष्मण जायभाये (ग्रामसेवक) तसेच सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




