पळसखेड चक्क्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन – शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, वनविभाग मात्र गप्प

पळसखेड चक्क्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन – शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, वनविभाग मात्र गप्प
शेतकरी नीचे मुख्य संपादक,
पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा – मुंबई–नागपूर महामार्गालगत असलेले पळसखेड चक्का हे गाव पुन्हा एकदा भीतीच्या छायेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचालींच्या चर्चा सुरू असतानाच दिनांक 9 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे आठ वाजता पत्रकार अशोकराव इंगळे यांच्या गाडीवरील कॅमेऱ्यात रस्त्यावरून जात असलेल्या बिबट्याचे स्पष्ट दृश्य कैद झाले. विशेष म्हणजे ही घटना गावाच्या हाकेच्या अंतरावर घडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले
या घटनेनंतर शेतकरी योद्धा कृती समितीने तत्काळ तपास केला असता श्री उत्तम रामभाऊ सोसे यांच्या शेतातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोच बिबट्या शेतात प्रवेश करताना दिसला. याच वेळी विष्णू भीमराव सोसे यांच्या शेताकडून येताना देखील तोच बिबट्या कॅमेऱ्यात टिपला गेला. या दोन स्वतंत्र ठिकाणांवरील दृश्यांनी एकच गोष्ट स्पष्ट झाली आहे – बिबट्या पळसखेड चक्का परिसरात मुक्तपणे फिरत आहे.
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. आता उरलेली थोडीफार कपाशी वेचण्यासाठी मजूर आणि शेतकरी स्वतः शेतात जाण्यास घाबरत आहेत. शेतकऱ्यांनी प्रशासनाला विचारले आहे – “आता शेतातला माल सडू द्यायचा का? आधी पावसाने मारलं आणि आता बिबट्याने!”
श्री उत्तम सोसे यांच्या शेतात बिबट्याचा व्हिडिओ स्पष्टपणे दिसत असूनही वनविभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. घटनेला तीन दिवस उलटून गेले असतानाही अधिकारी केवळ कागदोपत्री अहवाल तयार करण्यात व्यस्त आहेत. काही अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ एआयने तयार केला असल्याचा दावा केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न सरळ आहे – जर अशा सबबी देत अधिकारी गप्प बसले आणि उद्या एखादी अनुचित घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
शेतकरी योद्धा कृती समितीने या प्रकरणात ठाम भूमिका घेतली आहे. समितीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे की, शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तत्काळ गस्त वाढवावी, पिंजरे बसवावेत आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास संपूर्ण जबाबदारी वनविभागावर राहील.
दरम्यान, पळसखेड चक्का तसेच पिंपळगाव लेंडी, उंबरद, नरसिंह, शेलगाव राऊत, उगला, सावखेड तेजन, पिंपळखुटा, जळगाव वाघजाई आणि विझोरा या गावांतील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात न जाण्याचे, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधण्याचे व प्रकाशयंत्रांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासन आणि वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे मानव विरुद्ध वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा गंभीर स्वरूपात उभा राहिला आहे. “शेती वाचवायची की जीव? सरकार निर्णय घेणार तरी कधी?” असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
या घटनेची संपूर्ण माहिती शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी सोसे यांनी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार श्री मनोजजी कायदे तसेच सिंदखेड राजा पोलीस स्टेशनचे श्री श्रावण डोंगरे यांना दिली आहे.



