2026 ची स्वप्ने नको—यंदाच्या 100% पिक विम्याचा हिशोब द्या!🔥

2026 ची स्वप्ने नको—यंदाच्या 100% पिक विम्याचा हिशोब द्या!🔥
सध्या 2026 पासून पिक विम्यात बदल, अतिवृष्टी–ढगफुटीचे पूर्ण कव्हर अशा पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत. पण या माहितीची कोणतीही अधिकृत पुष्टी नसल्याचे शेतकरी योद्धा कृती समितीने स्पष्ट केले आहे.
समितीने राज्य सरकारला थेट प्रश्न केला आहे की यावर्षी अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या शंभर टक्के नुकसानीला शासनाने स्वतः मान्यता दिली आहे, तर मग याच वर्षाचा पिक विमा शंभर टक्के देणार का? शेतकऱ्यांचे नुकसान 2025 मध्ये झाले आहे; मग 2026 च्या आश्वासनांचा आधार कशासाठी?
जिल्हानिहाय नुकसान अहवाल, विमा कंपनीकडे पाठवलेले प्रस्ताव, मंजुरीची टप्प्याटप्प्याची माहिती आणि प्रत्यक्ष विमा रक्कम — हे सर्व अद्याप अस्पष्ट आहे. प्रीमियम वेळेवर भरलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मात्र का मिळत नाही, हा ठाम प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
निवडणुका जवळ आल्यामुळे “दिलासा” नावाखाली काही पोस्ट मुद्दाम व्हायरल केल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे. अधिकृत परिपत्रक येईपर्यंत कोणत्याही सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
शेतकरी नेते बालाजी सोसे यांनी सांगितले की शेतकऱ्यांचा हक्क भविष्यातील आश्वासनात नाही; यावर्षी झालेल्या नुकसानीच्या शंभर टक्के विम्यात आहे. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांचा एकच सवाल — यंदाचे नुकसान तुम्ही मान्य केले, मग यंदाचाच 100% पिक विमा
केव्हा?



