सरकारने अजून किती शेतकरी पुत्रांचे बळी घ्यायचे?कर्जमाफी फक्त कागदावर, शेतकऱ्यांच्या पदरी आत्महत्या!

सरकारने अजून किती शेतकरी पुत्रांचे बळी घ्यायचे?कर्जमाफी फक्त कागदावर, शेतकऱ्यांच्या पदरी आत्महत्या!
सिंदखेड राजा : पत्रकार भगवान साळवे मलकापूर पांगरा
राज्य सरकारच्या अपयशी धोरणांचा आणखी एक बळी जऊळका गावात गेला आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका शेतकरी पुत्राने गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना तालुक्यात घडली आहे. दरवेळी आश्वासनं, समित्या आणि तारखा जाहीर होतात; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात येते ती फक्त निराशा आणि मृत्यू!
जऊळका येथील गजानन आंबादास काकड (वय 40) या शेतकरी पुत्राने दिनांक 14 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 8 वाजता आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही आत्महत्या नव्हे, तर सरकारच्या संवेदनशून्य कारभारामुळे झालेला एक प्रकारचा खून असल्याची भावना गावकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
मृतकाच्या कुटुंबावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे केवळ 50 हजार रुपयांचे कर्ज होते. एवढ्या रकमेच्या कर्जासाठी एका शेतकरी पुत्राला आपला जीव द्यावा लागतो, ही बाब सरकारच्या तथाकथित शेतकरी हितैषी धोरणांवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.
“कर्जमाफीसाठी समिती कधी, अहवाल कधी आणि अंमलबजावणी कधी?” असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत.
या घटनेची माहिती मृतकाचे वडील आंबादास नामदेव काकड यांनी दिनांक 15 डिसेंबर रोजी किनगाव राजा पोलीस ठाण्यात दिली असून, या प्रकरणी मर्ग क्रमांक 34/2025, कलम 194 बीएनएसएस अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. विष्णू मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मात्र प्रश्न असा आहे की,
👉 प्रत्येक आत्महत्येनंतर चौकशी होते, पण धोरणं कधी बदलणार?
👉 समित्या बसतात, पण शेतकऱ्यांच्या घरात चुल पेटणार कधी?
👉 कर्जमाफीच्या तारखा जाहीर होतात, पण शेतकऱ्यांचा जीव वाचणार कधी?
या दुर्दैवी घटनेमुळे जऊळका गावात शोककळा पसरली असून संतापाची लाट उसळली आहे. सरकारने आता तरी जागे व्हावे, अन्यथा अशी यादी वाढतच जाणार असल्याचा इशारा ग्रामस्थ आणि शेतकरी संघटनांकडून दिला जात आहे.




