ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते; त्या ज्ञानाचे मंदिर म्हणजे शाळा
साताळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्य वाटप

ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते; त्या ज्ञानाचे मंदिर म्हणजे शाळा
साताळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्य वाटप
नाशिक | येवला प्रतिनिधी : प्रवीण पाटील
साताळी गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत “चला सारे शिकूया” या प्रेरणादायी संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी नवचैतन्य निर्माण व्हावे, या उदात्त हेतूने एक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. श्रेयस प्रकाश साबळे यांचे आजोबा रामदास आण्णा पाबळे यांनी आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवत, वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळा आणि आदर्श मार्ग समाजासमोर ठेवला.
या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर, कंपास पेटी, चित्रकला साहित्य, पेन्सिल, खोडरबर आदी आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. नव्या दप्तरांसह शैक्षणिक साहित्य हातात घेताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. शिक्षणाची गोडी वाढावी आणि शाळेशी नातं अधिक दृढ व्हावं, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम यांनी केले. यावेळी शेळके सर, गायकवाड मॅडम, निटूरकर मॅडम, अहिरे सर, लांडगे सर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा कोकाटे, उपसरपंच अमोल सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम कोकाटे, रेशन दुकानदार व विविध कार्यकारी संस्थेचे सदस्य यांनीही आपले मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले.
रामदास आण्णा पाबळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “मुलांच्या हातात शालेय साहित्य देताना जो आनंद मिळतो, तो शब्दांत मांडता येत नाही. भविष्यातही आमच्या हातून अशाच प्रकारची शैक्षणिक व सामाजिक सेवा घडत राहो, हीच इच्छा आहे.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांना प्रेरणा दिली.
विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ साताळीपुरता मर्यादित न राहता मुखेड गटातील येवला तालुक्यातील इतर शाळांमध्येही राबविला जात असून, अनेक विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळत आहे. मुलांच्या समस्या समजून घेऊन जिल्हा परिषद शाळांना जपण्याचे व त्यांना आवश्यक ती मदत देण्याचे सामाजिक कार्य रामदास आण्णा पाबळे सातत्याने करत आहेत.
श्रेयस पाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी आणि उपस्थित जनसमुदायाने श्रेयसला मनापासून शुभेच्छा दिल्या. इतर मुलांप्रमाणे केवळ केक कापून वाढदिवस न साजरा करता, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त असा उपक्रम राबविणे ही बाब निश्चितच कौतुकास्पद असून, असे उपक्रम दरवर्षी अविरत सुरू राहावेत, अशी भावना विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून व्यक्त केली.




