शिवनेरी ते पुरंदर ऐतिहासिक पिता–पुत्र भेट पालखी सोहळ्यास उद्यापासून प्रारंभ
स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी श्रद्धा, इतिहास आणि स्वराज्याच्या प्रेरणेतून आयोजित

शिवनेरी ते पुरंदर ऐतिहासिक पिता–पुत्र भेट पालखी सोहळ्यास उद्यापासून प्रारंभ
नाशिक/येवला प्रतिनिधी : प्रवीण पाटील
स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी श्रद्धा, इतिहास आणि स्वराज्याच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात येणारा श्रीक्षेत्र शिवनेरी गड ते श्रीक्षेत्र पुरंदर गड छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पिता–पुत्र भेटीचा ऐतिहासिक पालखी सोहळा यावर्षी सोमवार दिनांक ५ जानेवारी ते शुक्रवार दिनांक ९ जानेवारी २०२६ या कालावधीत मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात संपन्न होणार आहे.
या वर्षी या पालखी सोहळ्याचे आठवे वर्ष असून, हा सोहळा पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील स्वराज्य संघाचे संस्थापक ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. स्वराज्याच्या इतिहासाची जिवंत अनुभूती देणारा हा सोहळा केवळ धार्मिक नसून, शिव–शंभूंच्या आदर्शांचे स्मरण करणारा प्रेरणादायी प्रवास ठरत आहे.
सोमवार दिनांक ५ जानेवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या पवित्र शिवनेरी गडावरून या पालखी सोहळ्याचे विधिवत प्रस्थान होणार आहे. यावेळी शिवनेरीवरील शिवाई देवीची आरती, गोंधळ व धार्मिक विधी पार पडतील. त्यानंतर पालखी सोहळा गडाच्या पायथ्याशी येऊन पुढील प्रवासास सुरुवात करेल. या प्रारंभप्रसंगी जगद्गुरू संत तुकोबारायांचे वंशज माणिक महाराज मोरे, पंडित मोडक, उद्योजक रमेश येवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या दिवशी जुन्नर, नारायणगाव, कळम, मंचर, पेठ, खेड, राजगुरुनगर व चांडोली या ठिकाणी पालखीचा मुक्काम होणार आहे. मंगळवार दिनांक ६ रोजी सकाळी चाकण, कुरुळी, चिंबळी फाटा मार्गे आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेतले जाणार आहे. त्यानंतर तुळापूर येथे धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानभूमीचे दर्शन घेण्यात येईल तसेच भीमा–इंद्रायणी संगमावर छत्रपती शिवाजी महाराजांचे विधिवत स्नान विधी पार पडतील. या दिवशी पालखीचा मुक्काम फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत राहणार आहे.
बुधवार दिनांक ७ रोजी वढू बुद्रुक येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी पालखीचा मुक्काम होईल. गुरुवार दिनांक ८ रोजी थेऊर–दिवेघाट मार्गे सासवड, सोपानदेव समाधी तसेच कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर येथे पालखी मुक्कामी राहणार आहे.
शुक्रवार दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी नारायणपूर येथे श्री दत्त दर्शनानंतर पालखी सोहळा ऐतिहासिक पुरंदर गडावर दाखल होईल. येथे छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देणारा पिता–पुत्र भेटीचा भावनिक व ऐतिहासिक सोहळा भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न होणार आहे.
या संपूर्ण पालखी सोहळ्याबाबतची माहिती स्वराज्य संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे व सचिव शामकांत निघोट यांनी दिली असून, या ऐतिहासिक पालखी सोहळ्यात शिवप्रेमी, वारकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




