कॉलेज शाळाधर्मवाशिमविवाहशाळे कॉलेजसावित्रीबाई फुलेसोशल मीडिया

शेलुबाजार येथील लक्ष्मीचंद विद्यालयात डॉ. वसंत हंकारे यांचे भावस्पर्शी व्याख्यान

शेलुबाजार येथील लक्ष्मीचंद विद्यालयामध्ये दिनांक ६ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. वसंत हंकारे यांचे ‘न समजलेले आई-बाप…

शेलुबाजार येथील लक्ष्मीचंद विद्यालयात डॉ. वसंत हंकारे यांचे भावस्पर्शी व्याख्यान

   वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे

शेलुबाजार येथील लक्ष्मीचंद विद्यालयामध्ये दिनांक ६ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. वसंत हंकारे यांचे ‘न समजलेले आई-बाप… समजून घेताना’ या विषयावर अत्यंत प्रभावी व मनाला भिडणारे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक गिते सर तसेच रुग्ण सेवा ग्रुपचे शिवा साकके यांच्या हस्ते डॉ. हंकारे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर व्याख्यानास सुरुवात झाली.

डॉ. वसंत हंकारे यांनी आपल्या ओघवत्या, साध्या पण थेट मनात शिरणाऱ्या शब्दांत विद्यार्थ्यांना व पालकांना आई-वडिलांचे महत्त्व पटवून दिले. “आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. कारण एकदा तो श्वास निघून गेला, की भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच तुम्हाला मिठी मारायला येणार नाहीत,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

मुलांच्या आयुष्यातील खरे देव कोण, याची आठवण करून देताना ते म्हणाले, “मुला-मुलींच्या आयुष्यात एकच देव असतो तो म्हणजे बाप आणि एकच देवी असते ती म्हणजे आई.” आजच्या पिढीने आई-वडिलांना समजून घेण्याची वेळ आली असून आपल्या कोणत्याही कृत्यामुळे आई-वडिलांची मान खाली जाऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आई-वडिलांना लाचार करू नका, त्यांचे नाव उज्ज्वल करण्यासाठी चांगले संस्कार अंगीकारा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित करताना डॉ. हंकारे म्हणाले, “तुम्ही आयपीएलचे रन मोजता, खेळाडूंचे आकडे लक्षात ठेवता. पण ज्या बापाने आपल्यासाठी आयुष्यभर झटून किती ‘रन’ काढले, त्याचा हिशेब तुम्ही कधी करणार?” आज तो हिशेब करण्याची वेळ आली आहे आणि तो प्रत्येकालाच करावा लागेल, असे त्यांनी ठासून सांगितले.

भविष्यात तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर, वकील बनलात, लाखो रुपये कमावले, पण ते पाहण्यासाठी जर आई-वडीलच नसतील, तर त्या पैशांचे मोल काय? असा मार्मिक सवाल त्यांनी उपस्थित केला. लहानपणी आई-वडिलांनी आपल्यासाठी काय काय केले आहे, हे आपल्याला चांगलेच माहीत असते. मात्र कॉलेजमध्ये गेल्यावर ‘आम्हाला बंधनात ठेवले जाते’ असा गैरसमज होतो आणि त्यातून “आय हेट यू मम्मी-पप्पा” अशी वाक्ये मुलांच्या तोंडून निघू लागतात, याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी परिवर्तनाचे वादळ ठरेल, असा विश्वास व्यक्त करताना डॉ. हंकारे म्हणाले की, या व्याख्यानातून हरवलेले आई-वडील परत एकदा प्रत्येकाला नक्की सापडतील. “आई-वडिलांची किंमत कळायची असेल, तर ज्यांचे आई-वडील लहानपणीच गेले आहेत, त्या निराधाराला विचारा,” असे सांगत त्यांनी आई-वडिलांचे महत्त्व अधोरेखित केले.

सणासुदीच्या काळात बाप आपल्याला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो, तेव्हा संपूर्ण दुकान आपलेच आहे, असा भास होतो. कारण आपल्या पाठीशी आपला बाप उभा असतो, असे सुंदर उदाहरण देत त्यांनी आपले व्याख्यान संपवले.

या कार्यक्रमासाठी शेलुबाजार शहरासह परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सभागृहात भावनिक शांतता आणि आत्मपरीक्षणाची जाणीव निर्माण झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!