संत गजानन महाराज पायदळ पालखी सोहळा मार्गस्थ
स्थानिक पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराज

संत गजानन महाराज पायदळ पालखी सोहळा मार्गस्थ
प्रतिनिधी : विशाल गवई | अकोला
स्थानिक पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिर सेवा समिती, लक्ष्मी नगर, बोरगाव मंजू यांच्या वतीने दरवर्षी धार्मिक उत्सवांसह सामाजिक हिताचे विविध उपक्रम राबविले जातात. याच परंपरेनुसार गत दशकांपासून अखंड सुरू असलेला संत गजानन महाराज पायदळ पालखी सोहळा यंदाही मोठ्या भक्तिभावात संपन्न होत आहे.
दिनांक ११ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ दरम्यान पाच दिवस चालणारा हा पायदळ पालखी सोहळा बोरगाव मंजू ते शेगाव या मार्गावर मार्गस्थ झाला आहे. रविवार, दिनांक ११ जानेवारी रोजी सकाळी लक्ष्मी नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या चरणी महापूजा व जलाभिषेक करून पालखी सोहळ्यास भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला.
यानंतर पालखी सोहळा शहरातील मुख्य मार्गावरून नगर परिक्रमा करत शेगावकडे प्रस्थान झाला. पालखी मार्गावर भाविकांनी घरासमोर स्वच्छता ठेवत रांगोळ्या काढून, फुलांची उधळण करत पालखीतील श्रींच्या चरणी मनोभावे पूजाअर्चा व सेवा अर्पण केली. संपूर्ण परिसर “गण गणात बोते”, “जय गजानन श्री गजानन” या जयघोषाने दुमदुमून गेला.
या पालखी सोहळ्यात भाविक पांढरे शुभ्र वस्त्र, डोक्यावर टोपी परिधान करून सहभागी झाले होते. महिला सेवाधाऱ्यांसह भजनी मंडळ, टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिगीत सादर करत भक्तिरसात तल्लीन झाले होते. सुमारे ४०० ते ५०० भाविक या पायदळ पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
पाच दिवसांच्या पालखी सोहळ्याची दैनंदिन रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे –
रविवार रोजी बोरगाव मंजू येथून प्रस्थान करून अकोला येथे रात्री मुक्काम,
दिनांक १२ जानेवारी रोजी गायगाव येथे रात्री मुक्काम,
गायगाव येथून पुढे नागझरी येथे मुक्काम,
गोमाजी महाराज, नागझरी येथून प्रस्थान करून शेगाव संतनगरी श्रीक्षेत्रात मुक्काम,
तेथे कीर्तन व महाप्रसादानंतर बोरगाव मंजूकडे प्रस्थान करण्यात येणार आहे.
या पायदळ पालखी सोहळ्यात शेकडो लहान-थोर, अबालवृद्ध भाविक, भजनी मंडळ मोठ्या उत्साहात सहभागी झाले असून, संपूर्ण सोहळा भक्ती, शिस्त व सेवाभावाचे दर्शन घडविणारा ठरत आहे.
सदर संत गजानन महाराज पायदळ पालखी सोहळ्याचे आयोजन श्री संत गजानन महाराज मंदिर सेवा समिती, लक्ष्मी नगर, बोरगाव मंजू यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जय गजानन | गण गण गणात बोते 🙏




