महिला बचत गटांच्या वस्तू व खाद्यपदार्थांच्या जिल्हास्तरीय ‘वऱ्हाडी जत्रा’ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमास सदिच्छा भेट
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग

महिला बचत गटांच्या वस्तू व खाद्यपदार्थांच्या जिल्हास्तरीय ‘वऱ्हाडी जत्रा’ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमास सदिच्छा भेट
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थांचे भव्य जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री अर्थात ‘वऱ्हाडी जत्रा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. १६ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बसस्थानकाजवळ, वाशिम येथे उत्साहात सुरू आहे.
या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमास मान्यवरांनी सदिच्छा भेट देत महिला बचत गटांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. यावेळी त्यांनी विविध स्टॉल्सना भेट देऊन महिला उद्योजिकांशी सविस्तर संवाद साधला. महिला बचत गटांमार्फत तयार करण्यात आलेले घरगुती खाद्यपदार्थ, वऱ्हाडी पारंपरिक चवीचे पदार्थ, मसाले, लोणची, पापड, हातमागावरील कपडे, साड्या, ग्रामीण हस्तकला, सजावटीच्या वस्तू तसेच नाविन्यपूर्ण उत्पादनांची माहिती त्यांनी जाणून घेतली.
दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या ‘वऱ्हाडी जत्रा’ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटनप्रसंगी महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या मनोरंजनासाठी व महिलांच्या सहभागासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक खेळ, स्पर्धा, महिलांसाठी विशेष स्पर्धा, भाऊड व ऑर्केस्ट्रा यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाला जिल्ह्यातील तसेच शेजारील तालुक्यांतील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून, महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होत आहे. यामुळे महिलांना प्रत्यक्ष विक्रीद्वारे उत्पन्न मिळत असून त्यांचा आत्मविश्वास व उद्योजकीय दृष्टिकोन अधिक बळकट होत आहे.
आपल्या भाषणात मान्यवरांनी सांगितले की, महिला बचत गट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मजबूत आधारस्तंभ असून अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत या प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम होणार असून उत्कृष्ट स्टॉल्स, विक्री, सादरीकरण व स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास जिल्हा प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला बचत गटांच्या सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. एकूणच महिला सक्षमीकरणाला चालना देणारी ‘वऱ्हाडी जत्रा’ नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे.




