सिंदखेड राजा नगरपरिषदेत विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड; महिलांना नेतृत्वाची संधी
सिंदखेड राजा नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या

सिंदखेड राजा नगरपरिषदेत विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड; महिलांना नेतृत्वाची संधी
सिंदखेडराजा प्रतिनिधी / संपादक : विजय भालमोडे
सिंदखेड राजा नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांची निवडणूक सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि शांततेच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. या विशेष सभेत सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य तसेच महिला व बालकल्याण यांसारख्या महत्त्वाच्या विषय समित्यांवर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या आदेशानुसार ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सभेचे पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे यांनी संपूर्ण प्रशासकीय कामकाज पाहिले.
सभेत प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी केल्यानंतर आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत कोणताही प्रतिस्पर्धी अर्ज न आल्याने खालील सर्व निवडी बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
निवड झालेले विषय समिती निहाय सभापती :
सार्वजनिक बांधकाम समिती – सभापती : सौ. पूजा मंगेश खुरपे
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती – सभापती : कृष्णा माणिक मेहेत्रे
स्वच्छता व आरोग्य विषय समिती – सभापती : सौ. दिपाली योगेश म्हस्के (नगर परिषदेच्या उपाध्यक्षा)
महिला व बालकल्याण समिती – सभापती : सौ. अंबिका कैलास कोरडे
महिला व बालकल्याण समिती – उपसभापती : सौ. सोनाली गजानन मेहेत्रे
या निवडीमुळे नगरपरिषदेत महिलांना नेतृत्वाची महत्त्वाची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
स्थायी समितीची रचना जाहीर
विषय समित्यांच्या निवडीनंतर नगर परिषदेच्या अत्यंत महत्त्वाच्या स्थायी समितीचे गठन देखील जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ च्या कलम ६५ अन्वये ही समिती गठीत करण्यात आली आहे.
स्थायी समितीचे स्वरूप पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष तथा पदसिद्ध सभापती : सौरभ विजय तायडे (लोकनियुक्त नगराध्यक्ष)
सदस्य :
सौ. दिपाली योगेश म्हस्के (उपाध्यक्षा)
सौ. पूजा मंगेश खुरपे (सभापती, सार्वजनिक बांधकाम समिती)
कृष्णा माणिक मेहेत्रे (सभापती, पाणीपुरवठा समिती)
सौ. अंबिका कैलास कोरडे (सभापती, महिला व बालकल्याण समिती)
या विशेष सभेला नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच नामनिर्देशित सदस्य असे एकूण २३ सदस्य उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याबद्दल पीठासीन अधिकारी प्रा. संजय खडसे व मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे यांनी सर्व सदस्यांचे व उपस्थितांचे आभार मानले.




