वाशिम जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी सेवेला ब्रेक; रुग्णांना चार दिवसांची प्रतीक्षा
मनमानी कारभारामुळे गर्भवती महिला व गंभीर रुग्णांचे हाल

वाशिम जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी सेवेला ब्रेक; रुग्णांना चार दिवसांची प्रतीक्षा
मनमानी कारभारामुळे गर्भवती महिला व गंभीर रुग्णांचे हाल
वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या जिल्हा रुग्णालयात सध्या सोनोग्राफी सेवांबाबत गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सोनोग्राफी तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना तब्बल चार दिवसांचा कालावधी दिला जात असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, गर्भवती महिला, अपघातग्रस्त रुग्ण तसेच पोटदुखी, किडनी स्टोन, अंतर्गत जखमांसारख्या गंभीर आजारांचे रुग्ण असूनही त्यांना तातडीची तपासणी न करता “चार दिवसांनी या” असे सांगितले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जिल्हा रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र सोनोग्राफी कक्षात अपुऱ्या नियोजनामुळे व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे. ओपीडीमध्ये डॉक्टरांकडून सोनोग्राफी लिहून दिल्यानंतरही रुग्णांना वेळेवर तपासणी मिळत नाही. नोंदणी केल्यानंतर रुग्णांना अनेक तास ताटकळत ठेवले जाते आणि शेवटी चार दिवसांनंतरची तारीख दिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांचे हाल होत असून त्यांचा वेळ, पैसा आणि आरोग्य धोक्यात येत आहे.
विशेष बाब म्हणजे, रुग्णालयात सोनोग्राफी यंत्रणा उपलब्ध असूनही त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचा आरोप होत आहे. आवश्यक तांत्रिक कर्मचारी व डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात, अशी तक्रार रुग्णांकडून वारंवार केली जात आहे. काही वेळा ठराविक रुग्णांचीच तपासणी आधी केली जात असल्याचा संशयही व्यक्त होत असून यातून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप अधिक बळावला आहे.
गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी ही अत्यंत महत्त्वाची व संवेदनशील तपासणी आहे. वेळेवर तपासणी न झाल्यास आई व बाळाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून या बाबीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण व गरीब महिलांना खासगी रुग्णालयात जाऊन महागडी सोनोग्राफी करावी लागत असून त्याचा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.
या संपूर्ण प्रकाराबाबत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सोनोग्राफी सेवा सुरळीत करावी, अतिरिक्त कर्मचारी व वेळ वाढवावी तसेच रुग्णांना वेळेत तपासणी मिळेल याची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व रुग्ण संघटनांकडून करण्यात येत आहे.
जर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर या प्रश्नाविरोधात आंदोलन छेडले जाईल, असे नागरिकांकडून बोलले जात आहे.


