संगीतामय श्रीकृष्ण लीला अमृत कथा ज्ञानयज्ञ व माघी गणेश जयंतीनिमित्त काल्याचे कीर्तन भक्तिमय वातावरणात संपन्न
येवला तालुक्यातील देशमाने येथील श्री सिद्धिविनायक मंदिर प्रांगणात श्रद्धा, भक्ती

संगीतामय श्रीकृष्ण लीला अमृत कथा ज्ञानयज्ञ व माघी गणेश जयंतीनिमित्त काल्याचे कीर्तन भक्तिमय वातावरणात संपन्न
नाशिक / येवला प्रतिनिधी : प्रवीण पाटील
येवला तालुक्यातील देशमाने येथील श्री सिद्धिविनायक मंदिर प्रांगणात श्रद्धा, भक्ती व अध्यात्माने ओतप्रोत वातावरणात संगीतामय श्रीकृष्ण लीला अमृत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून श्रीकृष्णाच्या दिव्य बाललीला, रासलीला तसेच श्रीमद्भगवद्गीतेतील अमृतमय उपदेशांचे सुमधुर संगीतासह रसपूर्ण व भावस्पर्शी कथन करण्यात आले.
या पवित्र कथासोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा व आध्यात्मिक चेतनेचे वातावरण निर्माण झाले होते. संगीत अभंग, भजन व कीर्तनाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली ही अमृतकथा भाविकांसाठी आध्यात्मिक आनंदाचा अमूल्य ठेवा ठरली. कथा ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून या ज्ञानयज्ञाचा लाभ घेतला. कथाकथनादरम्यान भाविकांमध्ये उत्साह, भक्तिभाव आणि आत्मिक समाधान स्पष्टपणे दिसून येत होते.
माघी गणेश जयंती सोहळ्याच्या पावन व शुभ मुहूर्तावर श्रीक्षेत्र देशमाने येथे भागवताचार्य ह.भ.प. केशव (दादा) महाराज उखळीकर (परळी वैजनाथ) यांचे सुश्राव्य व भावपूर्ण काल्याचे कीर्तन मोठ्या भक्तिभावात संपन्न झाले. कीर्तनादरम्यान संतपरंपरेतील अभंग, भजन व हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तीरसमय झाला होता. कीर्तनातून गणरायांचे महत्त्व, भक्ती, सामाजिक एकता, सदाचार व अध्यात्मिक जीवनमूल्यांचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्यामुळे श्रीक्षेत्र देशमाने येथे दिवसभर भक्तिमय वातावरण नांदत होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री गणपती मंदिर ट्रस्ट तसेच समस्त ग्रामस्थ देशमाने बुद्रुक व देशमाने खुर्द यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सोहळ्यास परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, बंधू-भगिनी, युवक वर्ग तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचक्रोशीतील भाविकांनी या श्रीकृष्ण लीला अमृत कथा ज्ञानयज्ञ व हरिभक्त पारायणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानामृताचा मनःपूर्वक आनंद घेतला.
हे वृत्त नीलकंठ दुगड यांनी कळवले आहे.
—




