ग्रामपंचायत एरंडगाव खुर्द येथे मकरसंक्रांतीनिमित्त एकल महिला हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
येवला तालुक्यातील ग्रामपंचायत एरंडगाव खुर्द येथे मकरसंक्रांतीचे औचित्य साधून एकल महिलांसाठी विशेष हळदी-कुंकू कार्यक्रम

ग्रामपंचायत एरंडगाव खुर्द येथे मकरसंक्रांतीनिमित्त एकल महिला हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
नाशिक | येवला प्रतिनिधी : प्रविण पाटील
येवला तालुक्यातील ग्रामपंचायत एरंडगाव खुर्द येथे मकरसंक्रांतीचे औचित्य साधून एकल महिलांसाठी विशेष हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत महिलांचा सन्मान व सक्षमीकरण या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला गावातील महिला पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक-शिक्षिका तसेच महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व स्वागत गीताने करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक सरपंच योगिता शिवाजी खापरे होत्या, तर एकात्मिक बालविकास प्रकल्प, जळगाव बीटच्या पर्यवेक्षिका वंदना शिंपी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
मकरसंक्रांतीनिमित्त महिलांना हळद-कुंकू व संक्रांतीचे वाण वाटप करण्यात आले. विशेष बाब म्हणजे निसर्गाचा ऱ्हास होऊ नये या उद्देशाने प्लास्टिकचा वापर टाळत, ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांना पर्यावरणपूरक जूट बॅग (बारदानी पिशव्या) देण्यात आल्या. यावेळी चिठ्ठीद्वारे सोडत काढून शितल पडोळ यांना साडी भेट म्हणून देण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या वंदना शिंपी यांनी एकल महिलांविषयी समाजाने सन्मानाची वागणूक ठेवावी, त्यांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी द्यावी तसेच स्वतःच्या पायावर उभे राहून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याचे महत्त्व पटवून दिले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी ‘बाई पण भारी’ या भावनेतून एकल महिला असूनही आपल्या कर्तृत्वाने समाजात मानाचे स्थान निर्माण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायतीअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमास सरपंच योगिता खापरे, रेणुका पाटील, मिनाबाई ढेरंगे, माया मिंधे, कौशाबाई खुरसने, जिजाबाई उराडे, छाया गोसावी, शितल पडोळ, बोडके मॅडम यांच्यासह अनेक महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचित्रा कांगणे यांनी केले, तर कविता पडोळ यांनी उपस्थित एकल महिलांना मान-सन्मान व शासकीय योजनांचा लाभ मिळावा, अशी भावना व्यक्त करत आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम महिलांच्या सन्मानासोबतच सामाजिक जागृतीचा संदेश देणारा ठरला.




