जन्मदात्या पित्यापाठोपाठ राजकीय बापाचं छत्र हरवलं – अँड. नाझेर काझी
नियतीने पुन्हा एकदा माझ्यावर अतिशय कठोर असा घाव घातला आहे. मला जन्म देणाऱ्या पित्याचं छत्र नुकतंच

जन्मदात्या पित्यापाठोपाठ राजकीय बापाचं छत्र हरवलं – अँड. नाझेर काझी
प्रा. दिलीप नाईकवाड | बुलढाणा
नियतीने पुन्हा एकदा माझ्यावर अतिशय कठोर असा घाव घातला आहे. मला जन्म देणाऱ्या पित्याचं छत्र नुकतंच हरपलं असतानाच, माझ्या राजकीय जीवनातील वडीलधारी व्यक्तिमत्त्व, मार्गदर्शक आणि आधारवड म्हणून ओळख असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं अकाली निधन झालं. या दुहेरी आघाताने मी पूर्णतः कोलमडलो असून, आयुष्यभरासाठी पोरका झाल्याची तीव्र वेदना मनात घर करून आहे, अशा शब्दांत अँड. नाझेर काझी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
२५ जानेवारी रोजी मध्यरात्री माझ्या जन्मदात्या वडिलांचे दुःखद निधन झाले. त्या दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच अजित दादांनी मला धीर दिला, मानसिक आधार दिला. २७ जानेवारी रोजी पाठवलेल्या पत्राद्वारे दादांनी “ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही” असे नमूद करत माझ्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या पत्रातील शब्दांनी क्षणभर का होईना, मनाला मोठा आधार मिळाला होता.
मात्र दुर्दैवाने धीर देणारा तोच आधारवड आज दादांच्या रूपाने निघून गेला आहे. माझ्या राजकीय जीवनाचा कणा, माझा आधार, माझा मार्गदर्शक आज माझ्यापासून हिरावून घेतला गेला आहे. दादांचे अकाली निधन ही घटना केवळ मनाला न पटणारीच नाही, तर अंतःकरण सुन्न करणारी आहे, असेही काझी यांनी सांगितले.
अजित दादा हे माझ्या राजकीय जीवनातील खऱ्या अर्थाने आधारवड होते. त्यांनी केवळ शब्दांचा नाही, तर कृतीचा विश्वास दिला. ते शब्दाचे पक्के होते — जे बोलले ते करून दाखवणे, हेच त्यांचे संपूर्ण राजकीय आयुष्य होते. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या सर्वांगीण विकासाची अनेक स्वप्न पाहिली होती.
दादांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेडराजाच्या विकासाची ठोस वाटचाल सुरू झाली होती. प्रत्यक्षात दादा सात ते आठ तास सिंदखेडराजामध्ये उपस्थित राहिले. विकास आराखड्याला दिशा मिळाली होती, रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि सिंदखेडराजाच्या विकासाचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा झालेला होता.
परंतु दादांच्या अकाली जाण्यामुळे मातृतीर्थ सिंदखेडराजाची अपरिमित आणि कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. एवढ्यावरच ही हानी थांबत नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रानेही एक कणखर, निर्णयक्षम आणि शब्दाला जागणारा लोकनेता गमावला आहे. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
जन्मदात्या पित्याच्या जाण्याच्या दुःखातून सावरतो न सावरतो, तोच राजकीय जीवनातील पित्याचे छत्र हरपल्याने आयुष्यभरासाठी पोरकेपणाची जाणीव मनात कोरली गेली आहे. दादांची आठवण, त्यांचे शब्द, त्यांचा आधार आयुष्यभर सोबत राहील, अशा शब्दांत अँड. नाझेर काझी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.




