अण्णासाहेब देशमुख जयंतीनिमित्त अभिवादन सभा उत्साहात संपन्न
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथे जिजामाता ग्रीन एनर्जी लिमिटेड, शंकरनगर दुसरबीड येथे

अण्णासाहेब देशमुख जयंतीनिमित्त अभिवादन सभा उत्साहात संपन्न
बुलढाणा | प्रतिनिधी : प्रा. दिलीप नाईकवाड
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथे जिजामाता ग्रीन एनर्जी लिमिटेड, शंकरनगर दुसरबीड येथे दिनांक ४ फेब्रुवारी रोजी विदर्भातील पहिल्या जिजामाता सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. अण्णासाहेब देशमुख ऊर्फ शंकरराव विठ्ठलराव देशमुख यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा अत्यंत सन्मानपूर्वक व भावनिक वातावरणात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. अण्णासाहेब देशमुख यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी राजे हरिभाऊ जाधव, कारखान्याचे जनरल मॅनेजर अनंत बावणे, आबासाहेब राजे भोसले, डॉ. शिवाजी खरात, उत्तमराव देशमुख, भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिवराज कायंदे, ज्येष्ठ पत्रकार व जिल्हा प्रतिनिधी प्रा. दिलीप नाईकवाड, पत्रकार बाळासाहेब भोसले, नानासाहेब तौर, व्ही. टी. वायाळ, सुरेश बुलकडे, लोकजागरचे प्रवीण गीते, विश्वासराव देशमुख, निवृत्ती वायाळ, प्रवीण देशमुख, वैभव देशमुख, ऋषी देशमुख, दिलीप घुगे, पत्रकार गजानन सोनुने, गोविंद राठोड, मयूर निंबाळकर, विश्वजित बेंडमाळी, मिलिंद बापू देशमुख, रामदास नागरे, सुनील राठोड, सुनील पवार, संतोष मखरीचे, अजहर शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रा. दिलीप नाईकवाड यांनी कै. अण्णासाहेब देशमुख यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास, शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण, शिक्षणाचा प्रसार व सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत अण्णासाहेब देशमुख हे दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीने जपला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.
तसेच मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजामाता जन्मोत्सवानिमित्त नानासाहेब फाउंडेशनच्या वतीने जालना–वाशीम रेल्वे मार्गासाठी देण्यात आलेल्या निवेदनाबाबत प्रा. दिलीप नाईकवाड यांनी सविस्तर माहिती दिली. प्रस्तावित रेल्वे मार्गामध्ये मातृतीर्थ सिंदखेड राजा, किनगाव राजा, दुसरबीड, लोणार सरोवर, सखाराम महाराज लोणी, रिसोड व वाशीम या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश असून हा मार्ग पूर्ण झाल्यास या भागाच्या सामाजिक, धार्मिक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अण्णासाहेब देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला असून उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




