चिचोंडी येथे शॉर्ट सर्किटमुळे गव्हाचे पीक जळाले; महावितरणच्या निष्काळजीपणावर शेतकऱ्यांचा संताप
घटनेच्या व्हिडिओमध्ये एका महिला शेतकऱ्याच्या पाठीमागे वीजतारा खांद्याखाली लोंबकळताना स्पष्ट

चिचोंडी येथे शॉर्ट सर्किटमुळे गव्हाचे पीक जळाले; महावितरणच्या निष्काळजीपणावर शेतकऱ्यांचा संताप
नाशिक | येवला प्रतिनिधी : प्रवीण पाटील
येवला तालुक्यातील चिचोंडी परिसरात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे गव्हाच्या पिकाला आग लागल्याची गंभीर घटना रविवारी (दि. ५ एप्रिल) घडली. ज्ञानेश्वर कुटे, हर्षल कुटे, विवेक राजगुरू, अभिजित राजगुरू, अंजनाबाई कुटे व सचिन कुटे यांच्या शेतात ही आग लागली.
संबंधित वीज तारा गेल्या सहा महिन्यांपासून धोकादायकरीत्या खाली लोंबकळत असून, याबाबत शेतकऱ्यांनी पूर्वीच तक्रार करूनही महावितरणने दुर्लक्ष केले. जोरदार वाऱ्यामुळे तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झाले आणि गव्हाच्या काड्यांना आग लागली. शेतकरी व ग्रामस्थांनी तात्काळ प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र काही प्रमाणात पीक जळाले.
यापूर्वीही अशाच प्रकारात शेतकरी संजय मढवई यांचे ७० ते ८० क्विंटल गव्हाचे नुकसान झाले होते. तरीही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
व्हिडिओतील धक्कादायक वास्तव
घटनेच्या व्हिडिओमध्ये एका महिला शेतकऱ्याच्या पाठीमागे वीजतारा खांद्याखाली लोंबकळताना स्पष्ट दिसतात. ही बाब अत्यंत धोकादायक असून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणारी आहे.
तात्काळ दुरुस्ती न झाल्यास चिचोंडी बुद्रुक सबस्टेशनला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच आमदार मा. छगनरावजी भुजबळ व मा. किशोरभाऊ दराडे यांना निवेदन देण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मागण्या:
नुकसानभरपाई तात्काळ द्यावी, सर्व वीजतारा उंचावून दुरुस्त कराव्यात, ट्रान्सफॉर्मरची देखभाल करावी व जबाबदारांवर कारवाई करावी.



