दुसरबीड येथे आमरण उपोषणाची सांगता; बालाजी सोसे यांच्या आक्रमक इशाऱ्यानंतर प्रशासनाची धावपळ, लेखी आश्वासनानंतरच आंदोलन स्थगित
गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नाली, घरकुल व अन्य मूलभूत प्रश्नांसाठी ६ ते ८ एप्रिल दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयासमोर

दुसरबीड येथे आमरण उपोषणाची सांगता; बालाजी सोसे यांच्या आक्रमक इशाऱ्यानंतर प्रशासनाची धावपळ, लेखी आश्वासनानंतरच आंदोलन स्थगित

दुसरबीड (वार्ताहर): विशेष प्रतिनिधी
गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नाली, घरकुल व अन्य मूलभूत प्रश्नांसाठी ६ ते ८ एप्रिल दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर सांगता करण्यात आली. मात्र, या आंदोलनाला खऱ्या अर्थाने गती मिळाली ती शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांच्या आक्रमक भूमिकेमुळेच.
उपोषणाच्या पहिल्या दोन दिवसांत प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नव्हती. त्यामुळे संतप्त वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर बालाजी सोसे यांनी थेट राज्य सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान देत २४ तासांत मागण्या मान्य न केल्यास दुसरबीड येथे रस्ता रोको (चक्काजाम) आंदोलनाचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.
तत्काळ गट विकास अधिकारी (BDO) बांगर साहेब, घुगे साहेब, पवार साहेब तसेच किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व सहकारी उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून सर्व प्रमुख मागण्या मान्य करत तातडीने कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच उपोषणाची सांगता करण्यात आली.
उपोषणकर्ते व नेतृत्व:
गजानन पुंजाजी सोनुने, शेख फहीम, शेख मजीत, नानासाहेब भिकाजी तौर, सुरेश सुधाकर बुलकडे, शेख जावेद, शेख हबीब यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण पार पडले.
उपस्थित मान्यवर व पाठिंबा:
सामाजिक कार्यकर्ते गजाननजी दराडे, जेष्ठ नेते प्रभाकरराव ताठे, दिलीपजी नायकवाड, पारधी समाज मंडळ, महिला मंडळ, पत्रकार बांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनाला समर्थन दिले.
प्रमुख मागण्या व आश्वासन:
गावातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करणे
खडक पूर्णा धरणाचे पाणी २–३ महिन्यांत उपलब्ध करणे
सर्व नळ पाइपलाईन दुरुस्ती
गाव नमुना ८-अ चे काम तातडीने पूर्ण करणे
रस्ते दुरुस्ती व नाली सफाई
स्वच्छता मोहीम व घंटागाडी नियमित
पारधी समाजासाठी घरकुल व रस्ता उपलब्ध करून देणे
गावातील इतर नागरी समस्यांवर तातडीने कार्यवाही
महत्त्वाचा मुद्दा:
उपोषण सुरू झाल्यापासून प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले. मात्र बालाजी सोसे यांच्या ठाम इशाऱ्यानंतरच अधिकारी उपोषणस्थळी दाखल झाले आणि निर्णय घेतला गेला, ही बाब ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
इशारा कायम:
प्रशासनाने दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व आवश्यक असल्यास चक्काजाम करण्यात येईल, असा ठाम इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.



