धर्मबुलढाणामहाराष्ट्र

कमळजा माता मंदिर बुडत असताना प्रशासन गप्प – भाविकांचा संयम सुटण्याच्या मार्गावर

26 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत; अन्यथा जलसमाधी, लोणार बंद व तीव्र जनआंदोलनाचा इशारा

कमळजा माता मंदिर बुडत असताना प्रशासन गप्प – भाविकांचा संयम सुटण्याच्या मार्गावर

26 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत; अन्यथा जलसमाधी, लोणार बंद व तीव्र जनआंदोलनाचा इशारा

       रघुनाथ आघाव – लोणार तालुका प्रतिनिधी

लोणार – जगप्रसिद्ध लोणार सरोवर आज केवळ निसर्गाच्या चमत्कारासाठी नव्हे, तर प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे उद्भवलेल्या गंभीर संकटासाठी चर्चेत आहे. सरोवरातील पाण्याची पातळी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत असून, याचा थेट फटका कमळजा माता मंदिरासह परिसरातील अनेक प्राचीन व ऐतिहासिक मंदिरांना बसत आहे. मंदिराचा गाभारा, पायऱ्या, सभामंडप तसेच आजूबाजूचा परिसर हळूहळू पाण्याखाली जात असताना महसूल विभाग, पुरातत्त्व विभाग आणि जिल्हा प्रशासन मात्र केवळ मूकदर्शकाची भूमिका बजावत असल्याचा संतप्त आरोप कमळजा माता सेवा संघ व हजारो भाविकांनी केला आहे.

कमळजा माता मंदिर हे केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून, कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे, परंपरेचे आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. हे मंदिर डोळ्यांसमोर बुडत असताना प्रशासनाने कोणताही ठोस, दीर्घकालीन किंवा तातडीचा उपाय न केल्याने भाविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पाणीपातळी वाढत असल्याचे स्पष्ट संकेत अनेक महिन्यांपासून मिळत असतानाही प्रशासनाने वेळकाढूपणा केला, त्यामुळे आज मंदिर नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याची भावना व्यक्त होत आहे.

तज्ञांच्या मते, लोणार सरोवरात येणाऱ्या गोड्या पाण्याच्या नैसर्गिक झऱ्यांमुळे पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. या झऱ्यांचे डायव्हर्जन करणे, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी वैज्ञानिक उपाययोजना राबवणे, तसेच तज्ञांची समिती नेमून तातडीने निर्णय घेणे अत्यावश्यक होते. मात्र प्रत्यक्षात या दिशेने साधी प्राथमिक हालचालही न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कमळजा माता सेवा संघाने स्पष्टपणे भूमिका मांडत सांगितले आहे की, मंदिरासंदर्भातील कोणताही निर्णय घेताना स्थानिक सेवा संघाला विश्वासात न घेता निर्णय लादले जाणार असतील, तर ते निर्णय आम्हाला मान्य नसतील. मंदिराची एक अधिकृत चाबी तात्काळ सेवा संघाकडे सुपूर्द करून दैनंदिन पूजा, आरती, धार्मिक विधी तसेच आपत्कालीन परिस्थितीत थेट प्रवेशाचा अधिकार देण्यात यावा, अशी ठाम आणि लेखी मागणी सेवा संघाने प्रशासनाकडे केली आहे.

भाविकांचा रोष दिवसेंदिवस वाढत चालला असून, “देवालये पाण्याखाली जात असताना शांत बसणे म्हणजे श्रद्धेचा अपमान आहे. प्रशासन आमच्या संयमाची परीक्षा पाहत आहे,” अशा तीव्र प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत. गावोगावी, भाविकांमध्ये आणि धार्मिक संघटनांमध्ये याबाबत तीव्र चर्चा सुरू असून आंदोलनाची तयारीही सुरू झाल्याचे चित्र आहे.

कमळजा माता सेवा संघाने प्रशासनाला थेट इशारा देत स्पष्ट केले आहे की, 26 जानेवारी 2026 पर्यंत कमळजा माता मंदिर व इतर धार्मिक स्थळांच्या संरक्षणाबाबत ठोस, लेखी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीयोग्य निर्णय जाहीर न झाल्यास जलसमाधी आंदोलन, संपूर्ण लोणार गाव बंद आणि तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. या आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, जनतेचा रोष अनावर झाल्यास किंवा कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

“ही केवळ मागणी नाही, तर हा अंतिम इशारा आहे. कमळजा माता मंदिर वाचले नाही, तर लोणार पेटल्याशिवाय राहणार नाही,” असा संतप्त आणि ठाम आवाज आता लोणार परिसरात घुमू लागला आहे. प्रशासन वेळेत जागे होणार की भाविकांचा उद्रेक पाहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!