मंगरुळपीर तालुक्यातील सोनाळा प्रकल्पाचे कामे अर्धवट – शासनाचा निधी गेला तरी कुठे?

मंगरुळपीर तालुक्यातील सोनाळा प्रकल्पाचे कामे अर्धवट – शासनाचा निधी गेला तरी कुठे?
वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे

मंगरुळपीर तालुक्यातील सोनाळा प्रकल्पावर अर्धवट राहिलेल्या कामांचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसू लागला आहे. धरणातून पाणी सोडण्यात आले असले तरी कालव्याची कामे अपूर्ण असल्याने पाणी अर्ध्या मार्गावरच थांबले. उभ्या पिकांना पाण्याची तीव्र गरज असताना हे पाणी शेतापर्यंत पोहोचत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे जमिनीला भेगा पडत असून गहू, हरभरा आणि कपाशीच्या पिकांमध्ये पात्या-बोंडे गळतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
तालुक्यातील मोठा भाग हाच कालवा हा सिंचनाचा एकमेव आधार असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला तरी सध्या तापलेल्या वातावरणामुळे पिके करपत असून उत्पादनात मोठ्या नुकसानीची शक्यता वाढली आहे. कालवा पाण्याचा पुरवठा नियोजनात त्रुटी आणि पाटबंधारे विभागाची उदासीनता याविरोधात शेतकरी वर्गात संताप वाढू लागला आहे. पाणी कधी मिळणार? किती मिळणार? याचा ठोस उत्तरच अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
संयुक्त कालवा पाणी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाची भेट घेऊन कालव्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची आणि शेतीला पाणी मिळवून देण्याची मागणी केली आहे. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरलले आहे.
शासन आणि प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना न झाल्यास उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी वर्गाने तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाला केले आहे.




