
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात
वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात काल रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला. समृद्धी महामार्गावर मालेगावजवळ केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा. प्रतापराव जाधव यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाला. या घटनेत कारमध्ये प्रवास करणारे मंत्री जाधव यांचे अंगरक्षक, त्यांचे एक सहकारी आणि कारचालक असे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर पोहोचवून दिल्यानंतर सदर कार मेहकरकडे परत येत होती. याच दरम्यान रात्री उशिरा मालेगावजवळ मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या एका मिनी ट्रकने अचानक यु-टर्न घेतला. अचानक घेतलेल्या या यु-टर्नमुळे मागून येणारी मंत्र्यांच्या ताफ्यातील कार थेट ट्रकला जाऊन धडकली.
धडकेचा जोर इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही तत्काळ वाशिम येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
अपघाताची घटना रात्री उशिरा घडल्यामुळे याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना आज दुपारी देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी पुढील दिल्ली दौरा तात्काळ रद्द केला. नागपूरवरून मुंबईला पोहोचल्यानंतर ते मुंबईहून थेट मेहकरकडे रवाना झाले.
सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.




