रोटरी क्लब ऑफ अकोट तर्फे पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
रोटरी क्लब ऑफ अकोट यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त शहरातील तसेच तालुक्यातील विविध माध्यमांत कार्यरत

रोटरी क्लब ऑफ अकोट तर्फे पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी : विशाल गवई, अकोला
रोटरी क्लब ऑफ अकोट यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त शहरातील तसेच तालुक्यातील विविध माध्यमांत कार्यरत पत्रकारांचा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजातील चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे आयोजकांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या पत्रकारांनी अंगीकारावा, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ अकोटचे अध्यक्ष इंजि. रवि पवार होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रभाकरराव मानकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार संजय आठवले, तसेच डॉ. नवेश मोहता हे व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात इंजि. रवि पवार यांनी पत्रकारांचे समाजप्रबोधनातील, लोकशाही बळकटीकरणातील तसेच जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्यातील योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे सांगितले. पत्रकार हे समाजाचे डोळे व कान असून त्यांच्या लेखणीमुळेच अनेक प्रश्नांना न्याय मिळतो, असेही त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पत्रकार हे समाजाचे आरसे आहेत. त्यांच्या निर्भीड, वस्तुनिष्ठ व सत्याधारित लिखाणामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येतो. पत्रकारितेतील मूल्ये जपणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रभाकरराव मानकर यांनी आपल्या मनोगतात रोटरी क्लब ही केवळ सेवा संस्था नसून समाजाशी नाळ जोडणारी संघटना असल्याचे सांगितले. पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांच्या कार्याचा गौरव करणे ही रोटरी क्लबची सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विविध वृत्तपत्रे व माध्यमांत कार्यरत असलेले राहुल कुलट, सोनु सावजी, राजेश सोळंके, चंचल पितांबरवाले, नितीन तेलगोटे, युवराज मंगळे, अभिषेक पाठक, देवानंद खिरकर, धीरज बेलसरे, विशाल आग्रे आदी पत्रकार बांधवांचा स्मृतिचिन्ह व पेन देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ अकोटचे इंजि. प्रमोद लहाने, दिपक कतोरे, संतोष इस्तापे, चंदुसेठ अग्रवाल, राजकुमार गांधी, उद्धवराव गणगणे, हिमांशु अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने सदस्य व पत्रकार बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्याम शर्मा यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. नवेश मोहता यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.




