मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत लासलगाव
हळदी-कुंकू व एकल महिला सक्षमीकरण उपक्रम उत्साहात संपन्न

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत लासलगाव ग्रामपंचायतीत महिलांच्या सन्मानाचा उत्सव
हळदी-कुंकू व एकल महिला सक्षमीकरण उपक्रम उत्साहात संपन्न
“नाशिक / येवला प्रतिनिधी : प्रविण पाटील
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत मुख्यमंत्री पंचायतराज अभियान आणि ‘स्वाभिमान’ – एकल महिला सक्षमीकरण उपक्रम अंतर्गत निफाड तालुक्यातील ग्रामपंचायत लासलगाव येथे हळदी-कुंकू व एकल महिला सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर महिलांसाठी आयोजित एकल महिला सन्मान सोहळा आणि पारंपरिक हळदी-कुंकू समारंभाने कार्यक्रमाला सामाजिक व सांस्कृतिक अधिष्ठान लाभले.
या कार्यक्रमात सरपंच योगिताताई पाटील, महिला दक्षता समिती अध्यक्षा वेदिकाताई होळकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य-सदस्या यांच्या हस्ते उमेद अभियानांतर्गत बचत गटातील महिलांना धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी बचत गट प्रतिनिधी सीमा पाटील व सीआरपी ताई यांची प्रमुख उपस्थिती होती.
लासलगाव ग्रामपंचायतीचा हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबविला जातो, जो सामाजिक एकोपा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी ठरत आहे. कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. हळदी-कुंकू, ओटी भरणे, महिलांसाठी विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मार्गदर्शनपर उपक्रमांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमादरम्यान महिलांमध्ये आपुलकी, सौहार्द आणि एकोप्याचे दर्शन घडले. महिलांसाठी उपयुक्त माहिती व मार्गदर्शन केल्याबद्दल आयोजकांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
अशा उपक्रमांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो, सामाजिक सलोखा बळकट होतो आणि पारंपरिक सण-समारंभांची जपणूक होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.




