जालनापाऊसपाणीमराठवाडामहाराष्ट्रशेत रस्तेशेतकरीशेतीशेती न्यूजसामाजिक कार्यकर्ते

जालना जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी – ज्ञानेश्वर (माऊली) शेजुळ यांची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आग्रही मागणी

जालना जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले

जालना जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी – ज्ञानेश्वर (माऊली) शेजुळ यांची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आग्रही मागणी

               जालना (प्रतिनिधी)

जालना जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव आर्थिक मदत जाहीर करून ती त्वरीत वितरित करावी, अशी जोरदार मागणी भाजपा किसान मोर्चाचे जालना जिल्हा अध्यक्ष तसेच जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री ज्ञानेश्वर (माऊली) शेजुळ यांनी राज्याचे कृषिमंत्री श्री दत्तात्रय भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.

दिनांक 19 मार्च 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा बसला. मात्र, या नैसर्गिक आपत्तीची सर्वाधिक तीव्रता जालना जिल्ह्यात जाणवली. अनेक ठिकाणी शेतातील उभ्या पिकांचे पूर्णतः नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या मेहनतीचे महिन्यांचे परिश्रम काही क्षणांत उद्ध्वस्त झाले आहेत.

या गारपीटीमुळे आंबा, द्राक्ष, चिकू यांसारख्या फळबागांबरोबरच कांदा बियाणे, विविध भाजीपाला पिके तसेच इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी, शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडला असून, अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे.

सध्या जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू असले तरी, हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. या प्रक्रियेला अधिक वेळ लागल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास काही महिने विलंब होऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडणार आहे.

या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने पंचनाम्यांच्या प्रक्रियेवर वेळ न दवडता तातडीने प्राथमिक अहवाल तयार करून राज्य शासनाकडे सादर करावा, तसेच शासनानेही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जालना जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी श्री शेजुळ यांनी केली आहे. मंजूर झालेली मदत थेट आणि तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांना सावरण्यासाठी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. सरकारने या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना दिलासा द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी निवेदन सादर करताना श्री ज्ञानेश्वर (माऊली) शेजुळ यांच्यासोबत शेवली भागातील सामाजिक कार्यकर्ते तसेच वरखेड येथील प्रगतिशील शेतकरी श्री दिलीपराव बानायत पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!